या 7 टिप्ससह हिवाळ्यात आपल्या केसांची काळजी घ्या
6 minuteRead
(You can also read this blog in English here)
हिवाळ्याबद्दलची सर्वोत्तम गोष्ट कोणती? तर, आपण या ऋतूत अनेकदा खूप मोठी सेल्फ-केअर आणि पॅम्परिंग सेशन्स करतो! हिवाळ्यातल्या एखाद्या दिवशी रेंगाळणारी आंघोळ, मेणबत्त्या, गरम कॉफी, आरामदायक मोजे आणि असं बरंच काही आपल्याला खुणावत असतं! या हवामानातला एकमेव दोष म्हणजे कोरडेपणा! हिवाळा हा ऋतू आपली त्वचा आणि केस खूप कोरडे आणि फ्लेकी बनवू शकतो. म्हणून या हवामानात स्वतःची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे! जर तुम्हाला डिहायड्रेशन, कोरडेपणा आणि केसांमध्ये खाज या समस्या असतील, तर हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी याबद्दल काही टिप्स जाणून घेण्यासाठी पुढे वाचा!
कडकडीत गरम पाण्याने केस धुणं टाळा:
हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ म्हणजे कोण सुख! कधीकधी ही गरम पाण्याने आंघोळही कमी वाटते, हा हा! पण गरम पाण्याने आंघोळ जितकी सुखद वाटत असेल तितकेच केसांवर कडकडीत गरम पाणी वापरल्याने त्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे स्कॅल्पची (टाळूची) त्वचा कोरडी होऊ शकते, तिला खाज सुटू शकते आणि केसांत कोंडा होऊ शकते. गरम पाण्यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात, केसांची टोके रुक्ष होतात आणि केस भुरभरीत देखील होतात आणि असे केस तुटण्याची शक्यता वाढते. केस धुण्यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करा. त्वचेसाठी सुद्धा अगदी कडकडीत गरम पाण्याने आंघोळ करण्याची शिफारस केली जात नाही कारण त्यामुळे त्वचा कोरडी होऊन तिचे पापुद्रे सुटू शकतात.
स्कॅल्पची त्वचा मॉइश्चराइझ्ड ठेवा:
स्कॅल्प (टाळूची त्वचा) मॉइश्चराइझ्ड ठेवणे त्वचेइतकेच महत्त्वाचे आहे. हिवाळ्यामुळे तुमची त्वचा आणि केस खूप कोरडे आणि फ्लेकी होऊ शकतात. हवेतील आर्द्रता/ ओलावा कमी झाल्यामुळे केसांचा कोरडेपणा, तुटकी टोके आणि इतर अनेक समस्या होतात. हीच ती वेळ आहे जेव्हा घरात पडून राहिलेल्या तेलाच्या बाटल्या कामी येतात. स्कॅल्प आणि केसांची टोके मॉइश्चराइझ्ड ठेवण्यासाठी गरम तेलाचा मसाज करा. खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल, बदाम तेल किंवा तुमच्या आवडीचे कोणतेही तेल तुमच्या केसांच्या सर्व समस्यांवर आश्चर्यकारकरीत्या काम करू शकते.
केस धुण्याची वारंवारता मर्यादित ठेवा:
आपल्या सर्वांना माहीत आहे की हिवाळा हा कोरडा ऋतू आहे. या ऋतूत केस वारंवार धुण्याने नैसर्गिक तेले निघून जातात ज्यामुळे ते आणखी कोरडे होतात आणि केसांमध्ये खाज सुटते. हिवाळ्यात तुम्हाला चिकट आणि तेलकट स्कॅल्पच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही, त्यामुळे केस किती वेळा धुवावेत त्याची संख्या मर्यादित करणे सोपे होऊ शकते! तुमच्या स्कॅल्पवर सौम्य सल्फेट-मुक्त शैम्पू वापरण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ते आणखी कोंडायुक्त किंवा फ्लेकी होऊ नये.
हेअर कंडिशनर आणि मास्क यांच्याशी मैत्री करा:
हेअर कंडिशनर आणि हेअर मास्क हे हिवाळ्याच्या महिन्यांत केसांची काळजी घेण्याचे सर्वोत्तम मार्ग ठरू शकतात. एक जाड, चांगले मॉइश्चरायझिंग हेअर कंडिशनर तुम्हाला निस्तेज आणि तुटक्या केसांशी लढण्यात मदत करू शकते. केस धुण्यापूर्वी कंडिशनर कमीतकमी काही मिनिटे केसांवर राहू द्या. प्रत्येक वॉशनंतर कंडिशनर वापरा आणि एक्स्ट्रा आणि डीप हायड्रेशनसाठी आठवड्यातून एकदा हेअर मास्क लावा. हिवाळ्यातल्या थंड वाऱ्यांचा सामना करण्यासाठी तुम्ही लीव्ह-इन कंडिशनर सुद्धा वापरू शकता!
केसांवर उष्णतेचा वापर करणे टाळा:
ओल्या केसांमधून पाणी टपकणे त्रासदायक ठरू शकते - विशेषत: थंडीच्या महिन्यांत. त्यामुळे केस लवकर कोरडे करण्यासाठी तुम्ही हेअर ड्रायरचा आधार घेण्याची शक्यता असते. पण सत्य हे आहे की ब्लो-ड्राय केल्याने तुमचे केस खराब होऊ शकतात आणि आणखी तुटू शकतात. कोणत्याही उष्णतेचा वापर न करता आपले केस नेहमी नैसर्गिकरीत्या वाळू द्या. थंडीच्या महिन्यांत केस साधारणपणे नाजूक आणि कमकुवत असतात, त्यामुळे हीट-स्टाइलिंग टूल्स वापरल्याने समस्या आणखी वाढू शकते.
सौम्य मायक्रोफायबर टॉवेल वापरा:
आपण वापरत असलेले सामान्य टॉवेल हिवाळ्यात केसांसाठी थोडे खरखरीत ठरू शकतात. यामुळे केस भुरभुरीत आणि सांभाळायला कठीण होऊ शकतात. म्हणून, मऊ मायक्रोफायबर टॉवेलची निवड केल्याने तुम्हाला केसांच्या रुक्ष-भुरभरीत आणि मृत टोकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते.
पुरेसे पाणी प्या:
हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे. अंतर्गत हायड्रेशन हे बाह्य हायड्रेशनइतकेच आवश्यक आहे. तुमच्या केसांचा एक घटक म्हणजे पाणी हे तुम्हाला माहीत आहे का? त्यामुळे स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्या. डिहायड्रेशनमुळे तुमच्या त्वचेवर सुद्धा परिणाम होऊन ती खरखरीत होऊ शकते.
अनुवाद: अन्योक्ती वाडेकर Translated by Anyokti Wadekar
Write, Record and Answer! Consume Unlimited Content! All you need to do is sign in and its absolutely free!
Continue with one click!!By signing up, you agree to our Terms and Conditions and Privacy Policy.


