हे आहेत मुंबईतील सर्वोत्कृष्ट कॅफे

10 minute
Read

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

(You can read this Blog in English here)

लिओपोल्ड कॅफे

लिओपोल्ड कॅफे

इमेज स्रोत- पिंटरेस्ट

वेळ- सकाळी ०७.३० - १२:३० (मध्यरात्र)

कुठे- कुलाबा, मुंबई .

पाकशैली- नॉर्थ इंडियन, चायनीज, कॉन्टिनेन्टल, बेव्हरेजेस, डिझर्ट.

दोन जणांचा खर्च - २,००० रुपये (अंदाजे)

मुंबईतील 'कुलाबा कॉजवे'च्या गजबजलेल्या रस्त्यांवर वसलेला 'लिओपोल्ड' कॅफे हा शहरातील सर्वात लोकप्रिय कॅफेपैकी एक आहे. कॉजवे मध्ये खूप शॉपिंग करून थकला आहात का? मग लिओपोल्ड हे थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी उत्तम ठिकाण आहे आणि तोंडाला पाणी सुटेल असे उत्तमोत्तम पदार्थ तिथे मिळतात. शहरात बाकी राहिलेल्या अगदी मोजक्या इराणी कॅफेंपैकी एक आणि शहरातला पहिलावहिलाच कॅफे देखील असलेला लिओपोल्ड कॅफे मुंबईतील २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याचं लक्ष्य होता. तेव्हापासून दहशतवादा-विरूद्ध प्रतिकार आणि लोकांच्या एकात्मतेचे तो प्रतीक बनला आहे.

कॅफेचे वातावरण आरामदायक, पारंपरिक आणि ‘जुने पण मौल्यवान’ अशा स्वरूपाचे आहे. बॉलिवूडच्या जुन्या सिनेमांमध्ये दिसणाऱ्या भोजनालयांची आठवण हा कॅफे नक्कीच करून देईल! इथे मिळणारे पदार्थ परवडणारे, स्वच्छता राखून बनवलेले आणि रुचकर आहेत. शहरातील सर्वोत्तम कॅफेचा विचार केला तर बहुतांश मुंबईकरांच्या यादीत लिओपोल्ड नक्कीच अव्वल नंबरावर आहे!

पृथ्वी कॅफे

पृथ्वी कॅफे

इमेज स्रोत- पिंटरेस्ट

वेळ- सकाळी १०.३० - रात्री ११.००

कुठे- जुहू, मुंबई .

पाकशैली- नॉर्थ इंडियन, सँडविच, स्ट्रीट फूड.

दोन जणांचा खर्च - ३०० रुपये (अंदाजे)

उत्तम मांडणी, सुंदर तरीही नैसर्गिक वाटणारे वातावरण, खिशाला खूप फोडणी न बसता भूक चाळवणारे चविष्ट पदार्थ या सगळ्याबद्दल बोलायचे झाल्यास ‘पृथ्वी कॅफे’ हे बहुतेक शहरवासीयांसाठी ‘हँगआउट’ करण्याचे निर्वाणीचे ठिकाण आहे. प्रसिद्ध जुहू समुद्रकिनाऱ्यापासून अगदी जवळ आणि सुप्रसिद्ध पृथ्वी थिएटरला लागून असलेला पृथ्वी कॅफे हा शहरातील सर्वात जुन्या कॅफेंपैकी एक आहे.

या कॅफेमध्ये पिझ्झा, पास्ता, क्रसांट्स, गार्लिक ब्रेड आणि इतर बऱ्याच, बहुतकरून कॉन्टिनेन्टल/ पाश्चात्य पर्यायांसह, अमृतसरी कुलचे आणि आलू पराठे यासारखे अगदी पारंपरिक भारतीय पदार्थसुद्धा मिळतात. पृथ्वी कॅफेमध्ये मिळणारी पेये देखील खूप प्रसिद्ध आहेत कारण ती मजेदार दिसणाऱ्या 'मेसन जार'मध्ये सर्व्ह केली जातात आणि अत्यंत रुचकर असतात!

हिरव्यागार झाडांनी वेढलेल्या या कॅफेच्या बाहेर, उघड्यावर असलेल्या आसन व्यवस्थेमुळे बहुतेक लोक या कॅफेला संध्याकाळी भेट देणे पसंत करतात कारण संध्याकाळी ही झाडे सुंदर स्ट्रिंग लाईट्सनी सजवली जातात. त्यामुळे या कॅफेच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते!

कॅफे मॉन्देगार

इमेज स्रोत- पिंटरेस्ट

वेळ- सकाळी ०८ - रात्री ११.३० वाजता

कुठे- कुलाबा, >मुंबई

पाकशैली - कॉन्टिनेन्टल, इटालियन, चायनीज, फास्ट फूड

दोन जणांचा खर्च - १,३०० रुपये (अंदाजे)

कुलाबा कॉजवेच्या मध्यभागी असलेले 'कॅफे मॉन्देगार' हे मुंबईतील आणखी एक उत्तम आणि मुंबईकरांच्या अत्यंत पसंतीचे हँगआउट करण्याचे ठिकाण आहे. थोडीशी हटके, ‘अतरंगी’ वाटणारी सजावट आणि पारंपरिक शैलीतील आसनव्यवस्था...’मॉन्देगार’मध्ये हे सगळे आहे. हा कॅफे वर्षभर गर्दीने फुललेला आणि भरलेला असतो, अगदी दिवसाच्या कोणत्याही वेळी! ऑल राऊंडर मेनू, तोंडाला पाणी सुटेल असे पदार्थ आणि सौजन्यपूर्ण आणि वेगवान सेवेसाठी हा कॅफे खूप प्रसिद्ध आहे. आत कॅफेमध्ये खूप उत्साही वातावरण असते जे तरुणांसोबतच पर्यटक आणि प्रवाश्यांना देखील आकर्षित करते.

त्यांच्या लांबलचक आणि यम्मी मेनूमधला माझा वैयक्तिक आवडता पदार्थ आहे 'आल्फ्रेडो चिकन पास्ता' जो अत्यंत क्रीमी आणि पोटभरीचा आहे. इथले पदार्थ अगदी पैसावसूल आहेत आणि वातावरण घरच्यासारखे आहे. एकदा का तुम्ही मॉन्देगारमध्ये जेवलात की तुम्ही नक्कीच पुन्हापुन्हा इथे याल!

भारत कॅफे

भारत कॅफे

इमेज स्रोत - गूगल

वेळ- सकाळी ०८ - रात्री ११.००

कुठे- घाटकोपर पश्चिम, मुंबई .

पाकशैली - चायनीज, फास्ट फूड, नॉर्थ इंडियन, साउथ इंडियन, बेव्हरेजेस

दोन जणांचा खर्च - ६०० रुपये (अंदाजे)

भारत कॅफे हे सर्व प्रकारच्या भारतीय पदार्थांसाठी बहुधा सर्वात वैविध्यपूर्ण असे ठिकाण आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकासमोर असलेल्या भारत कॅफेमध्ये स्थानिक लोकांची नेहमीच गर्दी असते. हा कॅफे त्याच्या दक्षिण भारतीय पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. किंमतीनुसार पदार्थांचे प्रमाण सुद्धा पुरेसे असते आणि मेनूमधील सर्वच पदार्थ चाखून बघण्यासारखे आहेत!

भारत कॅफे हा अनेक लोकांसाठी रोजचा जेवणाचा थांबा आहे. या कॅफेतले कर्मचारी विनयशील आणि अत्यंत नम्र आहेत. माझा स्वत:चा इथला अनुभव खूप सुखद होता. मी इथे ‘पेपर डोसा’ खाऊन पाहिला; सोबत नारळाची चवदार चटणी आणि खमंग सांबार होते. या कॅफेच्या जवळ राहणाऱ्या लोकांनी या कॅफेला भेट दिलीच पाहिजे!

लीपींग विंडोज

लीपींग विंडोज

इमेज स्रोत- पिंटरेस्ट

वेळ- दुपारी १२ - रात्री ११.००

कुठे- वर्सोवा, मुंबई .

पाकशैली - कॉन्टिनेन्टल, फास्ट फूड, बेव्हरेजेस

दोन जणांचा खर्च - १३०० रुपये (अंदाजे)

तुम्हाला पुस्तकं वाचायला खूप आवडतात का? आणि वाचत असताना हाताशी काहीतरी स्नॅक किंवा थंड पेय सुद्धा हवं असतं? तसंच परफेक्ट लायटिंगमध्ये आरामात बसायलाही आवडतं? मग हा मस्त कॅफे तुमच्या वाचन-विरंगुळ्यासाठी अगदी परफेक्ट आहे!

'लीपींग विंडोज' मध्ये हे सर्वकाही आहे. तुम्ही या कॅफेत अजून गेला नसाल तर लवकर जा! अक्षरशः सर्व प्रकारच्या कॉमिक बुक्सनी भरलेले तळघर असलेला हा कॅफे भेट देण्याजोग्या ठिकाणांच्या तुमच्या यादीत सर्वात वरच्या स्थानी असायला हवा.

या दुमजली कॅफेच्या भिंती 'कॉमिक बुक स्ट्रिप्स'नी सजवलेल्या आहेत आणि इथे ‘जुन्या दिसणाऱ्या पण अत्यंत मौल्यवान’ अशा टेबल-खुर्च्या आहेत. इथे बसून काही आवडत्या पदार्थांवर तुम्हाला ताव मारता येईल. या कॅफेच्या तळघरात शांत आणि अक्षुब्ध असे वाचनक्षेत्र आहे. इथे एखादी व्यक्ती तिच्या आवडत्या कॉमिक्ससह बसू शकते आणि त्याचसोबत बरीच नवीन कॉमिक्स सुद्धा चाळून पाहू शकते. कॅफेमधले वातावरण मजेदार, उत्साही आणि सौंदर्यपूर्ण आहे. या सुंदर कॅफेमधून पदार्थ पार्सल स्वरूपात घेऊन जाण्याची (टेक अवे) सुद्धा सोय आहे परंतु इथल्या वातावरणाचा पूर्ण आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही इथेच डाईन-इन करावे असे आम्ही सुचवू.

पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही वर्सोव्यात याल तेव्हा डायनिंगचा एक नवीन अनुभव मिळवण्यासाठी आणि इथल्या ताज्यातवान्या करून सोडणाऱ्या आठवणींचा ठेवा प्राप्त करण्यासाठी या कॅफेमध्ये जरूर जा.

ग्रँडमामाज् कॅफे

ग्रँडमामाज् कॅफे

इमेज स्रोत- पिंटरेस्ट

वेळ- दुपारी १२ - रात्री १२.००

कुठे- मुंबईतील अनेक ठिकाणे

पाकशैली - इटालियन, कॉन्टिनेन्टल, अमेरिकन, डिझर्ट, बेव्हरेजेस

दोन जणांचा खर्च - ९०० रुपये (अंदाजे)

वातावरण आणि सौंदर्यशास्त्रानुसार रेखीव सजावट याबद्दल बोलायचे झाले तर ‘ग्रँडमामाज् कॅफे’ या यादीमध्ये अव्वल नंबरावर आहे. मुंबईत अनेक लोकेशन्स असलेला ‘ग्रँडमामाज् कॅफे’ खूप लोकप्रिय आहे. जुन्या पद्धतीची पण अत्यंत सुरेख, मौल्यवान दिसणारी सजावट आणि रंगवलेल्या सुंदर भिंती यामुळे हा कॅफे सर्वोत्कृष्ट ठरतो. विविध प्रकारच्या पिझ्झा आणि पास्तासह काही उत्तम कॉन्टिनेन्टल आणि अमेरिकन पदार्थांनी या कॅफेचा मेनू नटलेला आहे.

कॅफेमध्ये अनुभवाला येणारे वातावरण सुखकर आहे. हा कॅफे तिथल्या सौंदर्यात्मक सजावटीसाठी आणि मांडणीसाठी खूप लोकप्रिय आहे. 'ग्रँडमामाज् कॅफे’ ची मुंबईत सुमारे ८ आउटलेट्स आहेत. त्यातील प्रत्येक आउटलेटची मांडणी परिपूर्ण आहे आणि स्थानिक लोकांना सहज पोहोचता येईल अशा ठिकाणी हे कॅफे आहेत. कॅफेतील पदार्थांच्या किंमती या स्वादिष्ट पदार्थ, सौजन्यपूर्ण कर्मचारी आणि कॅफेच्या मोहवून टाकणाऱ्या आणि समृद्ध करणाऱ्या अनुभवाला साजेश्याच आहेत.

मुंबईतील अनेक लाजवाब कॅफेपैकी हे सगळे कॅफे आम्हाला खूप खास वाटले! शक्य असेल तेव्हा तुम्ही या कॅफेंना जरूर भेट द्यावी असे आम्ही सुचवतो कारण यातील प्रत्येक कॅफेमध्ये येणारा डायनिंगचा अनुभव हा त्या-त्या कॅफेच्या शैलीनुसार अत्यंत अद्वितीय आणि भुरळ पाडणारा आहे!

अनुवाद: अन्योक्ती वाडेकर  Translated by Anyokti Wadekar

Logged in user's profile picture

मुंबईत कोणता कॅफे सर्वोत्तम आहे?

पृथ्वी कॅफे

कॅफे मॉन्देगार

भारत कॅफे

लीपींग विंडोज

ग्रँडमामाज् कॅफे

मुंबईचे लिओपोल्ड कॅफे कुठे आहे?
मुंबईतील 'कुलाबा कॉजवे'च्या गजबजलेल्या रस्त्यांवर वसलेला 'लिओपोल्ड' कॅफे हा शहरातील सर्वात लोकप्रिय कॅफेपैकी एक आहे