नारळपाण्याचे ७ आश्चर्यकारक फायदे
6 minuteRead
(You can also read this blog in English here)
नारळपाणी हे मानवजातीसाठी वरदानच आहे, नाही का? लोक या अलौकिक अशा पेयाच्या खरोखर प्रेमात आहेत आणि योग्य कारणासाठीच त्याची वाहव्वा केली जाते! पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही शरीराला थंडावा देणारे आणि अनेक पोषकतत्वे पुरवणारे पेय शोधत असाल, तेव्हा नारळाच्या पाण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणून जरूर विचार करा. हे ‘सुपर ड्रिंक’ पोषकतत्त्वांनी परिपूर्ण आहे आणि ते शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी आहे. आम्ही नारळापाण्याच्या काही सर्वोत्तम फायद्यांची यादी तयार केली आहे आणि वारंवार विचारल्या जाणार्या काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे!
वजन कमी करण्यास मदत करते:
आपले अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी नारळपाणी हे एक उत्तम पेय आहे! नारळाच्या पाण्यात कॅलरीज कमी असतात आणि ‘बायो-अॅक्टिव्ह एन्झाइम्स’भरपूर असतात ज्यामुळे चयापचय वाढण्यास मदत होते. पोटॅशियम सारखे खनिज आणि फायबर (तंतुमय घटक) यांनी परिपूर्ण असे नारळपाणी हे वजन कमी करण्यासाठी खरोखर एक सर्वगुणसंपन्न पेय आहे. पोटावरची चरबी कमी करण्याच्या बाबतीत देखील हे चांगले आहे कारण संशोधनात असे दिसून आले आहे की पोटावरची चरबी कमी करण्यासाठी नारळ हा एक उत्तम पर्याय आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, नारळपाणी हा एक पोटभरीचा पदार्थसुद्धा आहे आणि त्यामुळे तुम्ही अरबट-चरबट स्नॅक्स खाण्यापासून वाचता.
शरीर आतून हायड्रेटेड (आर्द्र) ठेवते:
उन्हाळा आलाय, आणि त्यामुळे आपले शरीर हायड्रेटेड (आर्द्र) ठेवणे खूप महत्वाचे आहे. नारळपाण्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखी खनिजे भरपूर प्रमाणात असल्याने, शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी हे एक उत्तम पेय आहे. शरीरातून बाहेर पडलेले इलेक्ट्रोलाइट्स पुन्हा तयार करण्याच्या बाबतीत देखील हे चांगले आहे. सामान्यत:, साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या स्पोर्टस ड्रिंक्ससाठी आरोग्यदायी पर्याय म्हणून हे पेय ओळखले जाते. ज्यांना शरीर आर्द्र ठेवणारे चवदार आणि कमी कॅलरीज असलेले पेय हवे असेल त्यांच्यासाठी नारळपाणी हे वरदान आहे.
त्वचेसाठी आश्चर्यकारक फायदे:
त्वचेसाठी नारळ पाणी हे एक अलौकिक फायदे मिळवून देणारे पेय आहे! जीवनसत्त्वे, खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्सने संपृक्त असल्याने नारळपाणी त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत करते. हे अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध आहे आणि त्वचेवरील बारीक रेषा आणि सुरकुत्या यापासून चेहरा मुक्त ठेवण्यास आणि चेहऱ्यावर दिसून येणारी वृद्धत्वाची लक्षणे दूर करण्याससुद्धा मदत करते. नारळपाण्यात दाह-विरोधी आणि सूक्ष्मजीव-विरोधी गुणधर्म असतात जे मुरुमे, व्रण आणि हायपरपिग्मेंटेशन काढून टाकण्यात मदत करतात. हे ‘सुपर ड्रिंक’ डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांसाठी देखील आश्चर्यकारक फायदे मिळवून देते आणि त्वचेला नैसर्गिक चमक देऊ शकते. फेस मास्कमध्ये किंवा अगदी नैसर्गिक क्लेन्जरमध्ये मिसळून हे तुम्ही थेट चेहऱ्यावर देखील लावू शकता.
पोषकतत्वांचे पॉवरहाऊस:
नारळपाणी म्हणजे पोषकतत्वांचे पॉवरहाऊस! कॅलरी आणि फॅट्सचे प्रमाण यामध्ये जितके कमी तितकेच ते जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, प्रथिने आणि इलेक्ट्रोलाइट्सने संपृक्त असते. हे पोटॅशियम आणि मॅग्नेशियमने अत्यंत समृद्ध आहे. इतकेच नाही तर त्यात कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही खूप कमी असते. हे अँटिऑक्सिडंट्स, दाह-विरोधी आणि सूक्ष्मजीव-विरोधी गुणधर्मांनी देखील भरलेले आहे!
मधुमेहाच्या रुग्णांसाठी नारळपाणी उत्तम आहे:
नारळपाणी हे मधुमेहासाठी एक उत्तम गुणकारी पेय आहे! मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि इतर पोषकतत्वांमुळे नारळपाणी मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम आहे. यामध्ये फॅट्स आणि कोलेस्टेरॉल नसते. हा नारळपाणी पिण्याचा आणखी एक फायदा आहे. नारळपाणी इन्सुलिनच्या प्रतिकारात देखील मदत करते आणि त्यामुळे मधुमेहात मदत करते. शिवाय, नारळपाण्यात अँटि-ऑक्सिडंट असतात जे मधुमेहाच्या रुग्णांना मदत करतात कारण ते ‘फ्री-रॅडिकल्स’शी लढण्यास मदत करतात.
नारळपाणी आणि गरोदरपणा:
गरोदरपणाच्या काळात नारळपाणी हे सर्वोत्तम पेय ठरते. शरीरातून बाहेर पडलेल्या इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई करण्यात मदत करते आणि शरीराला आर्द्र ठेवण्यात मदत करते. छातीत जळजळ होणे हे गर्भवती महिलांमध्ये एक सर्वसामान्य लक्षण आहे आणि नारळपाणी छातीत जळजळ आणि अॅसिड रीफ्लक्स यामध्ये मदत करते. नारळपाणी आणि रक्तदाब? होय! नारळपाणी गर्भवती महिलांमध्ये रक्तदाब कमी करण्यास मदत करते आणि त्यांना आवश्यक पोषकतत्त्वे पुरवते.
कोणत्या नारळाचे पाणी अधिक चांगले: हिरव्या की तपकिरी?
हिरवे आणि तपकिरी हे दोन्ही नारळ पाणी काढण्यासाठी वापरले जातात. हिरव्या नारळाचे पाणी त्यात असलेल्या पोषक घटकांमुळे अधिक आरोग्यदायी मानले जाते. हिरव्या नारळाचे गोड पाणी हे त्याचे वैशिष्ट्य असते तर तपकिरी नारळाचा ताजा, पिकलेला गर हे त्याचे वैशिष्ट्य असते.
अनुवाद: अन्योक्ती वाडेकर Translated by Anyokti Wadekar
Write, Record and Answer! Consume Unlimited Content! All you need to do is sign in and its absolutely free!
Continue with one click!!By signing up, you agree to our Terms and Conditions and Privacy Policy.


