रेस्टॉरंटसारखे यम्मी 'पोटॅटो 65' घरच्या घरी!
4 minuteRead
(You can read this Blog in English here)
हे सांगण्याची गरजच नाहीये की २०२० या संपूर्ण वर्षाने आणि २०२१ या अर्ध्या वर्षाने आपल्याला खूप काही शिकवले आहे आणि आपल्यात असलेल्या अत्यंत दुर्मीळ अशा टॅलेंटस् चा शोध घ्यायची आपल्याला त्यानिमित्ताने संधी देखील मिळाली! नेहमीचे 'घरचे जेवण' सोडले तर रेस्टॉरंटमधल्या यम्मी आणि स्वादिष्ट डिशेसचा आस्वाद घ्यायचा मोह आपल्याला होतच असतो. आणि त्यामुळे आपण अनेक वेगवेगळ्या रेसिपीज घरीच बनवून बघू लागलो, आणि त्याचा परिणाम काय झाला म्हणता? तर त्यापैकी बऱ्याच डिशेस आपण घरच्या घरीच स्वतः बनवू शकलो!
‘पोटॅटो 65’ ही अशीच एक एक्झॉटिक, मस्त कुरकुरीत आणि चवदार डिश आहे जी घरच्या घरी बनवायला अत्यंत सोपी आहे! तुम्हाला माहीत होती का ही डिश? ती किती सोपी आहे यावर विश्वास नाही बसत? चिंता नको, आपण लगेच रेसिपीकडे वळू आणि घरच्या किचनमध्ये अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यासह हा यम्मी स्टार्टर बनवणे किती सोपे आहे ते पाहू!
तयारीसाठी वेळ - १५ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ - ३० मिनिटे
साहित्य -
- बटाटे
- दही
- हिरव्या मिरच्या
- मैदा
- मक्याचे पीठ (कॉर्न फ्लोअर)
- लसूण
- कांदा
- खाद्यतेल
- टोमॅटो केचप
- लाल तिखट
- मीठ
- गरम मसाला


कृती -
- सर्वात आधी, तुम्ही ६-७ बटाटे स्वच्छ धुवून घ्या, त्यांची साल काढा आणि त्यांचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करून घ्या.
- एक पाण्याने भरलेली कढई/ पॅन घेऊन त्यात २०-२५ मिनिटांसाठी बटाटे चांगले उकडून घ्या.

- बटाटे उकडत ठेवले की दोन कांदे, ३-४ हिरव्या मिरच्या आणि लसणीच्या ५-६ पाकळ्या अगदी बारीक चिरून घ्या.
- बटाटे उकडले की कढई/ पॅनमधले सगळे पाणी काढून घ्या.
- बटाट्यांमध्ये दोन मोठे चमचे मैदा आणि दोन मोठे चमचे मक्याचे पीठ (कॉर्न फ्लोअर) आणि एक लहान चमचा मीठ घाला.
- थोडे पाण्याचे थेंब शिंपडून या मिश्रणात सर्व बटाटे नीट घोळवा. मिश्रण बटाट्यांना चांगले लागले पाहिजे.
- एक पॅन/ कढई घेऊन त्यात तेल ओता. मंद आचेवर तेल गरम होऊ द्या.

- मिश्रणात चांगले घोळवलेले हे बटाटे कढई/ पॅनमधल्या तेलात सोडा आणि हलक्या तपकिरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या. मग ते बाजूला काढून ठेवा.
- दुसऱ्या पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करा, त्यात बारीक चिरलेले कांदा, मिरची आणि लसूण हे सर्व घाला आणि चांगले भाजून घ्या.

- सगळे मसाले घाला आणि आच मंद ठेवून हे सगळे मिश्रण चांगले परतून घ्या.
- आता त्यात तीन मोठे चमचे दही घाला आणि पुन्हा चांगले ढवळून घ्या. या स्टेपमध्ये तुम्हाला आवडत असेल तर चवीनुसार टोमॅटो केचपसुद्धा घालू शकता.
- सगळे मिश्रण चांगले ढवळून २-३ मिनिटे शिजू द्या.

- आता तळून घेतलेले बटाटे या मिश्रणात घाला आणि या सॉससारख्या मिश्रणाने बटाट्याचे सर्व तुकडे चांगले कव्हर होऊ द्या.

- वरून सजावटीसाठी बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर भुरभुरा आणि मिरच्या ठेवा.
- गरमागरम वाढा!
आणि तुमची डिश झाली तयार!
ही होती यम्मी ‘पोटॅटो 65’ ची रेसिपी. ही डिश बनवायला कमालीची सोपी आहे आणि रेस्टॉरंटसारखे पदार्थ खाण्याची तुमची इच्छा ही चवदार डिश नक्कीच पूर्ण करेल यात शंकाच नाही!

ही डिश घरी नक्की बनवून पाहा आणि कशी होते ते आम्हाला खालच्या कॉमेंट सेक्शनमध्ये लिहून नक्की सांगा!
तुमचा वीकएंड स्पेशल बनवण्यासाठी आम्ही अशा आणखी काही झटपट बनणाऱ्या आणि सोप्या रेसिपीज घेऊन येऊच! :)
अनुवाद: अन्योक्ती वाडेकर Translated by Anyokti Wadekar
Write, Record and Answer! Consume Unlimited Content! All you need to do is sign in and its absolutely free!
Continue with one click!!By signing up, you agree to our Terms and Conditions and Privacy Policy.


