लघु कथा - अडजस्ट करणारे मशीन

7 minute
Read

Highlights

चांगली मुलगी म्हणजे अड्जस्ट करणारी का? जाणून घेऊया या कथेमध्ये .

...



Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

 

सई आणि नील साठी आजचा दिवस फारच महत्त्वाचा होता. आज त्यांच्या लग्नाची बोलणी होणार होती. ते दोघे एम. बी. ए. करत असताना भेटले. पहिले, मैत्री निर्माण झाली, मग स्पेशल फ्रेंड्स बनले आणि मग मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले समजलेच नाही. कोणीही कोणाला प्रपोझ केले नाही. मनातच समजले कि दोघे एकमेकांसाठी किती कॅम्पॅटिबल आहेत ते!🥰

तीन महिन्याआधी त्यांनी आपल्या घरच्यांना सांगितले कि दोघांना लग्न करायचे आहे. घरच्यांना माहीत होते कि दोघेहि खूप चांगले फ्रेंड्स आहेत, पण ते कधी प्रेमात पडले हे समजले नाही. दोघांच्या घरातून काही विरोध नव्हता.

सई बऱ्याच वेळा नील च्या घरी जायची, तेव्हा त्याचा आईवडिलांशी आणि लहान भावाशीसुद्धा बोलायची. सगळे खूपच मनमिळाऊ होते आणि सईला पसंत करायचे.

एम. बी. ए. नंतर नीलला एका मल्टिनॅशनल कंपनी मध्ये डेप्युटी मॅनेजर चा जॉब मिळाला. त्याला तीन वर्षांचा अनुभवहि होता. पण जेव्हा त्याने सईला त्याच्याच कंपनी मध्ये अप्लाय करायला सुचवलं, तेव्हा तिच्या मनात वेगळा विचार चालला होता.

"नील, मला आवडलं तू मला सुचवलेलं, पण मला फ्रीलांसिन्ग करायचंआहे. मी एक टीम प्लेअर नाहीये. मला स्वतःचे निर्णय स्वतःला घ्यायला आवडतात."

नीलला तिचा निर्णय आवडला आणि त्याने तिला बराच सपोर्ट दिला. "जॉब कि बिझनेस तुझ्यावर अवलंबून आहे, सई. मी आहे तुझ्या सोबत."

सईची आई खूप खुश होती कि तिच्या मुलीला नील सारखा समंजस आणि चांगला मुलगा मिळाला. पण जेव्हा लग्नाच्या बोलणीचा दिवस होता, तेव्हा ती थोडीशी विचारात होती.

"मम्मा, काय झाले? तू का इतका विचार करत आहेस? नीलच्या घरचे सर्व कूल आहेत."

तिची आई काहीच म्हणाली नाही आणि ते सर्व नीलच्या घरी पोचले.

नील चा लहान भाऊ आणि सईचा लहान भाऊ दोघेही बाल्कनीमध्ये जाऊन गप्पा मारत बसले. त्यांना मोठ्यांच्या बोलण्यात इतका इंटरेस्ट नव्हता. ते फुटबॉल आणि ऍनिमेच्या चर्चेत रमले.

नील आणि सईच्या आईवडिलांनी चर्चा करायला सुरुवात केली.

आधी, नीलचे वडील म्हणाले कि त्यांना या लग्नावर काहीच हरकत नाही. "आम्हाला तर आनंदच झाला. ते दोघे खूप छान मित्र-मैत्रीण आहेत. त्यांनी लग्नाचा पण विचार करावा, असा आमच्या दोघांच्या मनात खूप यायचं. पण आजकालच्या पिढीला तसं सुचवायचं योग्य वाटत नाही. म्हणून कधी बोललो नाही. पण जेव्हा नील ने आम्हाला सांगितलं कि त्याला सईबरोबर लग्न करायचं आहे, तेव्हा खरंच टेन्शन कमी झाल्यासारखं वाटलं. मुलाला योग्य जोडीदार मिळाला ना, कि पालकांची काळजी मिटते."

सईच्या बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. आपली मुलगी दुरावली जाणार याबद्दल खंत तर वाटत होतीच, पण तिला छान कुटुंब मिळेल याची खात्री त्यांना झाली.

मग, सईची आई म्हणाली. "नील खूपच चांगला मुलगा आहे."

नीलच्या आईने ऐकले आणि स्मितहास्य करीत त्या म्हणाल्या, "नील तर चांगला आहेच, पण सईसुद्धा खूप समजूतदार मुलगी आहे. आम्हाला पण अशीच मुलगी हवी होती, समंजस आणि सगळ्यांसोबत अडजस्ट करणारी." त्यांनी हसतच वाक्य संपवलं.

"अडजस्ट करणारी? अशी मुलगी हवी होती तुम्हाला?" सईच्या आईने गंभीरपणे विचारले.

नीलच्या आई आणि वडील या प्रश्नाने थोडे बिथरले पण नीलच्या आईने सहजच स्पष्ट केले, "आजकालच्या मुली बघतो ना आम्ही. काही ताळतंत्र नसतं त्यांना. कुणाचं ऐकत नाही. अडजस्टमेन्ट तर त्यांना माहीतच नाही. स्वतःचं खरं करतात. हट्ट करतात. सई तशी अजिबात नाहीये. सगळ्यांचं ऐकते, मोठ्यांचा आदर करते, सगळं ऐकते, आणि पटकन अडजस्ट होते. अशीच मुलगी आम्हाला आमची सून म्हणून हवी आहे."

सई ला खूप आवडलं त्या बोलत होत्या. तिचं कौतुक करत होत्या ना! पण सईची आई अजिबात खुश दिसली नाही. तिच्या कपाळावर आठ्या आल्या आणि ती म्हणाली, "तुम्ही सईला अजून ओळखलंच नाही. तिच्याबद्दल काहीच माहिती नाही तुम्हाला."

"अहो, आहे ना माहिती, सई नीलसोबत होती ना एम.बी.ए ला. तिथेच तर दोघे भेटले. आणि आता ती फ्रीलान्सिंग करू इछते." नीलचे बाबा म्हणाले.

"आम्हाला तिचा निर्णय आवडला. आपल्या आवडीची वेळ निवडता येते. म्हणजे लग्नानंतर घरात लक्ष सुद्धा देता येईल. एकदा काय तो जॉब मिळाला कि मग संपूर्ण दिवस त्यातच जातो. घराकडे अजिबात लक्ष देता येत नाही. मला माहीत आहे ना, मी पण एक वर्किंग वुमन आहे ना! फ्रीलान्सिंग मध्ये ती घरी सुद्धा रिकामी नाही बसणार आणि शिक्षणाचा उपयोग पण होईल."

इतकं सगळं स्पष्टीकरण मिळूनही सईची आई खुश नव्हती.

"माझं बोलणं तुम्हाला नाही समजली, वहिनी." सईची आई म्हणाली. सई आणि नील शांन्तपणे संपूर्ण संभाषण ऐकत होते. त्यांना असा अंदाज आला कि काहीतरी बिनसतंय, पण मोठ्यांसमोर त्यांना काहीच बोलता येत नव्हतं.

"सई आजकालच्या मुलींपेक्षा काही वेगळी नाही. ती नक्कीच समंजस आहे आणि मोठ्यांचा आदर हि करते, पण तिला आमची कोणती गोष्ट पटली नाही कि ती आम्हाला सांगते. तिचा मुद्दा मांडून देते. अडजस्ट ती नक्कीच करते पण कधीकधी कुरकुर पण करते. कोणती गोष्ट आवडली नाही कि कंप्लेनपण करते. आणि बऱ्याच वेळा हट्ट धरते, अगदी आजकालच्या मुलामुलीं सारखा, तुमच्या नील सारखा. आणि फ्रीलान्सिंगचं म्हणाल तर ती ते स्वतः साठी करत आहे. घराकडे लक्ष ती जॉब करूनहि देईल. आम्हाला याची खात्री आहे. मी जेव्हा आजारी होते, तेव्हा सई तिचा अभ्यास, इंटर्नशिप सांभाळून घरची कामे पण करायची. पण फ्रीलान्सिंग ती त्या कारणामुळे करत नाही. तिला इंडिपेंडंटली काम करायचं आहे, म्हणून ती ते करत आहे."

सईच्या आईने खोल श्वास घेतला आणि पुढे गंभीरपणे म्हणाली, "तुम्हाला कदाचित माझे बोलणे आवडणार नाही आता किंवा तुम्हाला असं वाटेल कि मुलीच्या आयुष्यात खूप जास्त ढवळाढवळ करत आहेत. पण आम्हाला आमच्या मुलीला 'अडजस्ट करणारं मशीन' नाही बनवायचे. तुम्ही जसे नील बरोबर राहता, तसच तिच्याबरोबर राहा. आम्हाला खूप आवडेल."

नीलच्या आई आणि बाबा विचारात पडले. काही वेळाने स्वतः नीलच्या आई म्हणाल्या, " तुमचं बोलणं बरोबर आहे. मला पटलं. आम्ही आमच्या सुनेला अड्जस्ट करणारी, असं गृहीत नाही करून घेणार. जसा नील आहे, तशी ती आहे आमच्यासाठी."

सईला थोडा वेळ वाटत होतं कि आपली मम्मा काहीतरीच बोलत आहे, पण तिला तिचे म्हणणे पटले. तिने आईला मिठी मारली आणि 'थँक्स, मम्मा' असे म्हणाली.  😇

Logged in user's profile picture