प्लॅस्टिक कचरा कमी करण्याचे ८ सोपे मार्ग

12 minute
Read

Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

(You can read this Blog in English here)

आतापर्यंत आपल्या सर्वांना हे माहीतच झाले आहे की प्लॅस्टिकच्या वस्तू या पूर्णपणे कधीच डिग्रेड (जीवाणूंच्या साहाय्याने कुजून नष्ट) होत नाहीत, त्या आपल्या पर्यावरणातच राहतात, त्याचे हळूहळू छोटेछोटे तुकडे होत राहतात, आणि ‘रिसायकलिंग’चे (पुन्हा उपयोगात आणण्यासाठी एखाद्या वस्तूवर प्रक्रिया करणे) अनेक उपक्रम अनेक देशांमध्ये राबवले जात असूनसुद्धा फक्त ५% प्लॅस्टिकचे प्रभावी पद्धतीने रिसायकलिंग होते, आणि ४०% चा उपयोग जमिनीत भराव टाकण्यासाठी वापरलेले टाकाऊ साहित्य म्हणून होतो आणि ३०% पर्यावरणात तसेच राहते. उरलेले प्लॅस्टिक जाळून टाकले जाते, ज्यामधून ऊर्जानिर्मिती करत असतानाच सोबत मृत वनस्पती आणि प्राणी यांच्या अवशेषापासून तयार केलेली इंधने अतिरिक्त वापरली जातात, जेणेकरून आणखी नवीन प्लॅस्टिकच्या वस्तू तयार व्हाव्यात, ज्याची आपल्या अर्थव्यवस्थेत सातत्याने मागणी होत असते.

जवळपास ८०% समुद्री कचरा हा जमिनीवरून आलेला असतो. एकतर तो किनाऱ्यावरून वाहत आलेला असतो किंवा वादळात वाहून आणि जोराच्या वादळात गटारे तुडुंब भरून वाहू लागल्याने नद्यांमध्ये येतो, आणि या सगळ्यामुळे समुद्री जिवांना खूप मोठा धोका निर्माण होतो. प्लॅस्टिकच्या या कचऱ्यात समुद्री जीव अडकू शकतात किंवा हा कचरा चुकून गिळू शकतात. बऱ्याचदा असे होण्याचे कारण हे असते की या जिवांना प्लॅस्टिकच्या या वस्तू आपले भक्ष्य आहेत असे वाटते किंवा मग समुद्री पाण्यामुळे या वस्तूंचे लहान लहान तुकड्यांत रूपांतर झालेले असते.. प्लॅस्टिक हे विशेषतः चिंताजनक आहे कारण ते जैव पद्धतीने कुजून नष्ट होत नाही (ते नॉन-बायोडिग्रेडेबल असते) आणि म्हणून इतर प्रकारच्या कचऱ्याच्या तुलनेत ते १००० वर्षेपर्यंत पर्यावरणात टिकून राहू शकते.

प्लॅस्टिकच्या बॅगा, स्ट्रॉ, कॉफीच्या ग्लासवरची झाकणे आणि प्रवासात अन्नपदार्थ ठेवण्यासाठी वापरले जाणारे डबे या अशा काही सर्वसाधारण वस्तू आहेत ज्या आपल्या महासागरांमध्ये असलेल्या जवळपास ८ दशलक्ष टन इतक्या प्लॅस्टिक प्रदूषणाचा भाग आहेत, आणि या प्रदूषणाने वन्यजीवन आणि मानवी आयुष्य दोन्हीही धोक्यात आणले आहे. 'रिसायकलिंग'मुळे जमिनीच्या भरावात, जलमार्गात आणि विविध पर्यावरण-प्रणालींमध्ये येऊन पडणारा प्लॅस्टिकचा कचरा कमी होत असला तरी बऱ्याच सरकारी महापालिका फक्त ठरावीक प्रकारचेच प्लॅस्टिक 'रिसायकल' करू शकतात. या प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा काही भाग जरी रिसायकल केला गेला तरी त्यासाठी अखेर खूप ऊर्जा आणि पाणी लागतेच, आणि म्हणून एकदा वापरायच्या अशा वस्तू तयार करण्यासाठी हा पर्याय तितकासा व्यवहार्य नाही. जमिनीच्या भरावात आणि समुद्रात जो प्लॅस्टिकचा कचरा येऊन पडतो त्याचे विघटन होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात, आणि त्यातून पर्यावरणात जे विषारी पदार्थ सोडले जातात, तो एक मोठा चिंतेचा विषय आहे.

आपल्या जीवनशैलीचे या अनुषंगाने परीक्षण करणे आणि आपला स्वतःचा प्लॅस्टिकचा वापर कमी करणे हे अत्यंत महत्वाचे आहे, म्हणूनच ही सुरुवात करण्यासाठी हे आहेत ८ अभिनव मार्ग:

१. विकतचे बाटलीबंद पाणी घेऊ नका.

पॉलिटीन आणि बाटली

हा जीवनशैलीमधला बदल अगदी सोपा आणि प्रभावी आहे. तुमच्या कॅरीबॅगमध्ये तुमची स्वतःची पुन्हापुन्हा वापरता येण्याजोगी पाण्याची बाटली ठेवणे हा प्लॅस्टिक प्रदूषण कमी करण्याचा एक 'स्मार्ट' मार्ग आहे. पाण्याच्या दूषितीकरणाची जिथे भीती नसेल तिथे प्लॅस्टिक कचरा कमी करण्यासाठी पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर कमी केला पाहिजे हे उघडच आहे. पुन्हा भरता येईल अशी बाटली त्याऐवजी जवळ बाळगा. बहुतांश कॉफी शॉप्स आणि रेस्टॉरंटमध्ये तुम्ही जर विनंती केलीत तर ‘डिस्पोझेबल कप’च्या ऐवजी तुमची पुन्हा वापरता येण्याजोगी बाटली ते नक्कीच भरून देतील.

२. घाऊक खरेदी करा.

एका भांड्यात अन्न

तुम्ही वारंवार ज्या वस्तू/ पदार्थ खरेदी करता त्याचे उत्पादन आणि त्याचे आवरण/वेष्टन यासंबंधातले प्रमाण तपासून पाहा आणि दीर्घ काळात अनेक छोट्या छोट्या पॅकेजमधल्या वस्तू घेत राहण्यापेक्षा मोठ्या कंटेनरमध्ये एकदाच घाऊक खरेदी करता येते का ते पाहा. दह्याचे एकदा सर्व्ह करायचे कंटेनर, प्रवासात लागणारे टॉयलेटरीजचे सामान, सुक्या मेव्याची लहान पॅकेजेस - तुम्ही वारंवार ज्या वस्तू/ पदार्थ खरेदी करता त्याचे 'उत्पादन आणि त्याचे आवरण/वेष्टन' यासंबंधातले प्रमाण तपासून पाहा आणि दीर्घ काळात अनेक छोट्या छोट्या पॅकेजमधल्या वस्तू घेत राहण्यापेक्षा मोठ्या कंटेनरमध्ये एकदाच घाऊक खरेदी करता येते का ते पाहा. अनेक कुटंबांमध्ये किचनमध्ये सर्वात जास्त प्लॅस्टिकचा कचरा तयार होत असतो. तुमच्या स्वतःच्या पिशव्या आणि कंटेनर घेऊन येणे आणि अन्नपदार्थांची घाऊक खरेदी करून साठा करून ठेवणे ही प्लॅस्टिक पॅकेजिंगच्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्याची दोन सर्वात प्रभावी धोरणे आहेत.

३. तुमच्या मासिक पाळीसाठी लागणारी उत्पादने शक्य तितकी पर्यावरण-पूरक असू द्या.

मासिक पाळीचा कप

'पीसेफ' (Peesafe) या ब्रँडचा मेन्स्ट्रुअल कप असो किंवा 'सानफे' (Sanfe) या ब्रँडची पुन्हा वापरता येण्याजोगी (रियुझेबल) पॅड्स असोत, मासिक पाळीशी संबंधित  उत्पादनांमुळे निर्माण होणारा कचरा कमी व्हावा म्हणून अनेक नॉन-डिस्पोझेबल पर्याय उपलब्ध आहेत. पॅड्स आणि टॅम्पॉन्स यांच्या पॅकेजिंगसाठी जे प्रचंड प्लॅस्टिक लागते त्याचे प्रमाण या पर्यायांमुळे कमी होते. टॅम्पॉन्सचा वापर सोडून देणे तुम्हाला शक्य नसले तर प्लॅस्टिकच्या अॅप्लिकेटर्स सह येणारे टॅम्पॉन्स वापरणे तुम्ही बंद करू शकता.

४. तुमच्यासोबत नेहमी एक शॉपिंग बॅग बाळगा.

इंग्लंडमध्ये प्लॅस्टिक बॅगच्या वापरावर जेव्हा टॅक्स लावला गेला, तेव्हापासून प्लॅस्टिक बॅग्सचा वापर झपाट्याने ८५ टक्केपर्यंत कमी झाला. आपल्यापैकी बऱ्याच जणांना एक अतिरिक्त बॅग जवळ ठेवण्याची सवय असतेच; तुम्हाला जर आठवणीने अशी बॅग स्वतःजवळ ठेवण्यात अडचण येत असेल, तर एक दुमडून ठेवता येण्याजोगी बॅग तुमच्या नेहमीच्या बॅगमध्ये ठेवून द्यावी.

थोडेफार किरकोळ बदल करून आपण दैनंदिन पातळीवरचे प्लॅस्टिकच्या वापराचे प्रमाण लक्षणीय पद्धतीने कमी करू शकतो.

५. मायक्रोबीड्सचा वापर टाळावा.

एक खरखरीत घटक म्हणून प्लॅस्टिक मायक्रोबीड्सचा वापर फेस स्क्रब, टूथपेस्ट आणि बॉडी वॉश मध्ये केला जातो, ज्याने तुम्हाला घासून स्वच्छ केल्यामुळे ताजेतवाने झाल्याचा अनुभव येतो. परंतु, या मायक्रोबीड्सच्या सूक्ष्म आकारामुळे, ते समुद्री जिवांच्या शरीरात अगदी पटकन शिरतात आणि आपल्या सांडपाण्याच्या सिस्टममधून महासागरात सोडले जातात. शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, इतर अतिसूक्ष्म प्लॅस्टिक कणांसोबत मायक्रोबीड्स हे समुद्री जिवांच्या आहाराचा एक भाग होऊ लागले आहेत, आणि आपण मनुष्य समुद्री जिवांचे सर्वात जास्त भक्षण करत असल्याने आता आपल्या शरीरात देखील हे प्लॅस्टिक प्रवेश करू लागले आहे.

६. अन्नपदार्थांचे पॅकेजिंग करण्यासाठी कमीत कमी प्लॅस्टिकचा वापर करा.

सूपरमार्केटमध्ये गेल्यावर आपल्या निवडीमध्ये थोडाफार बदल केला किंवा खरेदीचे ठिकाण बदलले तर आपण खरेदी करत असलेल्या प्लॅस्टिकचे प्रमाण आपल्याला प्रयत्नपूर्वक कमी करता येईल. त्याशिवाय, प्री-पॅकेज्ड फळे आणि भाज्या यांच्यापेक्षा सुट्या स्वरूपात उपलब्ध असलेली फळे आणि भाज्या बहुतांश वेळा अधिक स्वस्त असतात!

७. प्लॅस्टिकच्या टप्परवेअर (Tupperware) ऐवजी काचेचे किंवा स्टीलचे डबे वापरा.

स्टीलचे डबे

तुम्ही जर कामाच्या ठिकाणी डबा घेऊन जात असाल तर टप्परवेअर (Tupperware)चा डबा हा तुमच्या दिवसाचा एक भाग असतोच. आम्ही असे सुचवू इच्छितो की तुम्ही यात बदल करून काचेचे किंवा स्टेनलेस स्टीलचे डबे त्याऐवजी वापरावेत. त्यामुळे फक्त पर्यावरणालाच नाही तर तुमच्या आरोग्याला देखील फायदा होईल कारण या प्लॅस्टिकच्या डब्यांतून धोकादायक घटक अन्नात झिरपत असण्याची शक्यता असते.

८. उत्पादकांना आव्हान द्या.

आपण आपल्या स्वतःच्या सवयी बदलून जरी बदल घडवून आणत असलो, तरी मोठ्या उत्पादक कंपन्यांचा त्यामानाने खूप मोठा प्रभाव या गोष्टीवर असतो. पॅकेजिंगच्या बाबतीत एखादी कंपनी काही बदल करू शकते असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्की त्याबाबत आवाज उठवला पाहिजे. कंपनीला पत्र लिहा, ट्वीट करा किंवा मग सरळ त्या कंपनीचा जो प्रतिस्पर्धी अधिक पर्यावरण-पूरक उत्पादन करत असेल त्याच्याकडून वस्तू खरेदी करा.

आपल्या महासागरांना सर्वात मोठा धोका आहे तो अज्ञानापासून, आणि जर आपण त्यासंबंधी प्रशिक्षण, जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न तसेच सागरी जिवांच्या संरक्षणासाठी चळवळ हे सर्व वेळीच केले नाही तर पुढच्या पिढीसाठी हे महासागर उरतील अशी आशा आपण करू शकत नाही. ही समस्या फार गंभीर आहे, पण त्यावर उत्तरे आहेत आणि जितके जास्त लोक याबद्दल बोलू लागतील तितके चांगले.

ग्राहकांनी आपला पैसा अशाच कंपन्यांना द्यावा ज्यांची उत्पादने प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करून तयार केली जातात; रेस्टॉरंट्स, कॅफे आणि खाद्यपदार्थांशी संबंधित इतर व्यक्तींशी/ संस्थांशी बोलून प्लॅस्टिकला पर्याय म्हणून काय करता येईल याबाबत चर्चा करावी; आणि प्लॅस्टिकच्या वापरावरील बंदीचे पुरस्कर्ते म्हणून काम करावे. प्लॅस्टिकबंदीला पाठिंबा देऊन, याक्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना देणगी देऊन, समुद्रकिनारा आणि सागरी स्वच्छता अभियानात भाग घेऊन आपण प्लॅस्टिक प्रदूषणाबद्दल जनजागृतीला हातभार लावू शकतो.

निष्कर्ष

आज आपल्यासमोर जे ध्येय असले पाहिजे ते हे आहे की आपण तयार करत असलेला कचरा केवळ व्यवस्थित ‘रिसायकल’ किंवा विलग करणेच महत्वाचे नसून आपली उपभोगी प्रवृत्ती कमी झाली पाहिजे. असे केल्याने, आपल्या महासागरांमध्ये सोडले जाणारे प्लॅस्टिक कमी व्हावे यासाठीच्या चळवळीत तुमचा आपसूकच सक्रिय सहभाग होईल. तुम्ही स्वतः प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करण्यासोबतच तुमचे कुटुंब, मित्रमैत्रिणी, सहकारी यांनासुद्धा तसे करण्यास स्वतःचे उदाहरण देऊन प्रवृत्त केलेत तर तुमच्या या कृत्याचा पर्यावरणाच्या भल्यावर पडणारा प्रभाव खूप मोठा असेल.

अनुवाद: अन्योक्ती वाडेकर  Translated by Anyokti Wadekar

Logged in user's profile picture

प्लास्टिकचा कचरा कसा कमी करायचा?
आपल्या जीवनशैलीचे या अनुषंगाने परीक्षण करणे आणि आपला स्वतःचा प्लॅस्टिकचा वापर कमी करणे हे अत्यंत महत्वाचे आहे, म्हणूनच ही सुरुवात करण्यासाठी हे आहेत ८ अभिनव मार्ग:

विकतचे बाटलीबंद पाणी घेऊ नका.

घाऊक खरेदी करा

तुमच्या मासिक पाळीसाठी लागणारी उत्पादने शक्य तितकी पर्यावरण-पूरक असू द्या.

तुमच्यासोबत नेहमी एक शॉपिंग बॅग बाळगा.

मायक्रोबीड्सचा वापर टाळावा.

अन्नपदार्थांचे पॅकेजिंग करण्यासाठी कमीत कमी प्लॅस्टिकचा वापर करा.

प्लॅस्टिकच्या टप्परवेअर (Tupperware) ऐवजी काचेचे किंवा स्टीलचे डबे वापरा.

उत्पादकांना आव्हान द्या