प्राणिजन्य दुधाला पर्याय किंवा 'वीगन' दुधाचे प्रकार

7 minute
Read



Disclaimer This post may contain affiliate links. If you use any of these links to buy something we could earn a commission. We are a reader supported website and we thank you for your patronage.

(You can read this Blog in English here)

लहानपणी आपल्या सर्वांनाच दूध  पिण्याचे आग्रह केला जायचा, बरोबर ना? दुधाचे विविध पर्याय आपल्याला माहीत नव्हते आणि त्यावेळी आपल्याला माहीत असलेले एकमेव दूध म्हणजे गाईचे दूध! परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे वनस्पती-आधारित दूध किंवा संपूर्णतः शाकाहारी (इंग्रजीत ‘वीगन’) दुधाची एक संकल्पना अस्तित्वात आहे ज्यामध्ये प्राणिजन्य दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ आणि लॅक्टोज अजिबात नसते!

संपूर्णतः शाकाहारी, प्राण्यांपासून न मिळवलेले (वीगन) दूध ही तुलनेने नवीन संकल्पना आहे आणि दुधाच्या या प्रकाराचे बाजारात उपलब्ध असलेले विस्तृत पर्याय पाहून दडपून जायला होते. लॅक्टोज-असहिष्णुता, संपूर्णतः शाकाहारी, प्राण्यांपासून तयार झालेले काहीही न वापरणारा - ज्याला इंग्रजीत ‘वीगनीझम’ असे नाव आहे - ती जीवनशैली, पोषणाच्या दृष्टीने फायदे आणि अशा बऱ्याच कारणांमुळे लोक संपूर्णतः शाकाहारी (वीगन) दूध घेणे निवडू शकतात. तुमचे काम थोडे सोपे व्हावे म्हणून आम्ही प्राणिजन्य दुधासाठी उपलब्ध असलेले काही पर्याय निवडून तुमच्यासाठी आणले आहेत. तुम्ही यातील एकाची निवड करू शकता!

ही आहे ६ ‘वीगन’ दुधाच्या पर्यायांची यादी:

१. नारळाचे दूध: नारळाचे दूध हा प्राणिजन्य दुधासाठी एक उत्कृष्ट 'वीगन' पर्याय आहे. आपण काहीतरी गोड आणि मलईदार शोधत असाल तर नारळाचे दूध आपल्यासाठी एक उत्तम पर्याय आहे! हे बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि जास्त कष्ट न घेता घरी सुद्धा तयार केले जाऊ शकते. त्यासाठी फक्त ताज्या, तयार नारळाचा लगदा पाण्यात मिसळून ब्लेंडरने ब्लेंड करून घ्या आणि मग तो गाळून घ्या. बस्स, तुमचं घरगुती, नैसर्गिकरीत्या गोड, दाट नारळाचा दूध काही मिनिटांतच तयार झालं. आपल्याला पाहिजे तसे कमी-जास्त पाणी घालून आपण त्याचा जाड किंवा पातळपणा कमी-जास्त करू शकता. केवळ प्राणिजन्य दुधाचा पर्याय असण्याव्यतिरिक्त, नारळाच्या दुधाचे अनेक आरोग्यविषयक फायदे देखील आहेत जसे की ते वजन कमी करण्यास मदत करू शकते आणि काही जीवनसत्त्वे आणि खनिजांचा ते चांगला स्रोत आहे. याचा उपयोग भारतीय रस्सा-आमट्या, स्मूदी आणि इतर बऱ्याच चवदार पाककृती बनवण्यासाठी केला जाऊ शकतो.

२. बदामाचे दूध: तुम्हाला जर कठीण कवचाच्या फळांची (नट्स) चव आवडत असेल तर बदामाचे दूध ही तुमच्यासाठी योग्य निवड आहे. जे लोक लॅक्टोज-असहिष्णू आहेत त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे कारण तो 'वीगन' आणि दुग्ध-मुक्त आहे. हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध शाकाहारी दूध 'कीटो' नावाच्या डाएटला देखील पूरक आहे कारण यात पिष्टमय पदार्थांचे (कार्ब्स) प्रमाण सर्वात कमी आहे. हे घरी काही सोप्या घटकांसह म्हणजे बदाम आणि पाण्याने देखील तयार केले जाऊ शकते. बदाम काही तास, शक्यतो रात्रभर भिजत ठेवा. बदाम (हवे असल्यास) सोलून ब्लेंडरच्या जारमध्ये घाला. ते पाण्यासोबत ब्लेंड करून घ्या आणि वेगळ्या बरणीत काढून घ्या आणि आपले मलईदार, कठीण कवचाच्या फळांच्या चवीचे ‘बदामाचे दूध’ तयार झाले! बदामाचे दूध हृदयाचे आरोग्य, हाडांचे आरोग्य, मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि रक्तदाब कमी करण्यासाठी ओळखले जाते. हे चविष्ट दूध व्हिटॅमिन 'ए' चा एक चांगला स्रोत आहे. हे व्हिटॅमिन डोळ्यांसाठी चांगले मानले जाते.

३. सॉय मिल्क: सॉय मिल्क (सोया दूध) हे एक लोकप्रिय वनस्पती-आधारित दूध आहे जे 'वीगन' लोकांसाठी उत्तम आहे. सोयाबीन रात्रभर पाण्यात भिजवून मग पाण्यासोबत ब्लेंड करून ते तयार केले जाते. सॉय कच्चे सेवन केले जाऊ शकत नाही म्हणून सोयाबीन पाण्यासोबत ब्लेंड केल्यानंतर ते गाळून घ्या आणि २०-२५ मिनिटे गरम करा. सॉय मिल्क मध्ये गायीच्या दुधासारखीच पोषणमूल्ये असतात. प्रथिनांनी समृद्ध असलेले हे दूध कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास आणि हृदरोगापासून बचाव करण्यास मदत करू शकते. सोया दूध वजन कमी करण्यास देखील मदत करते आणि तंतुमय घटकांनी समृद्ध आहे. तसेच कॅल्शियम-समृद्ध असलेले सोया दूध हे मधुमेह असलेल्या रुग्णांना फायदेशीर ठरते आणि रक्तदाब नियंत्रित करते.

४. ओट्सचे दूध: ओट्सचे दूध हा प्राणिजन्य-दुधाचा अजून एक लोकप्रिय पर्याय आहे. ते बनवायला सुद्धा इतर डेअरी-फ्री दुधाइतकेच सोपे आहे. आपल्याला फक्त ओट्स आणि पाण्याची आवश्यकता असेल. फक्त एका ब्लेंडींग जारमध्ये काही लाटून सपाट केलेले ओट्स आणि पाणी घाला आणि ब्लेंड करून घ्या. इच्छित पोतासाठी हे मिश्रण गाळून घ्या. या लॅक्टोज-मुक्त आणि 'वीगन' दुधात प्रथिने आणि व्हिटॅमिन 'बी' भरपूर प्रमाणात असतात. ओट्सचे दूध कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी आणि हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील जाणले जाते.

५. काजूचे दूध: काजूचे दूध बाजारात नवीनच आले आहे परंतु प्राणिजन्य दुधाचा तो एक स्वादिष्ट पर्याय आहे. काजूचे दूध तयार करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आणि इतर दुधांसारखीच आहे. आता ही प्रक्रिया तुमच्या बऱ्यापैकी ओळखीची झालीच आहे. फक्त काही धुतलेले, भिजवलेले काजू घ्या, ते ब्लेंडरमध्ये पाण्यासोबत ब्लेंड करून घ्या आणि कोणत्याही खटाटोपाशिवाय अगदी काही वेळातच आपले चवदार काजूचे दूध तयार झाले! काजूचे दूध भरपूर पौष्टिक मूल्यांसह चवदार आणि मलईदार सुद्धा आहे. हे संपूर्णतः शाकाहारी (वीगन) दूध डोळ्यांसाठी चांगले आहे आणि हृदयाचे आरोग्य सुधारू शकते. त्याशिवाय, मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे उत्तम ठरते कारण ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास सुद्धा मदत करू शकते.

६. भांगेचे दूध: भांगेच्या बियांपासून बनवलेल्या भांगेच्या दुधाला एक कठीण कवचाच्या फळांसारखी (इंग्रजीत ’नटी’) चव असते आणि गायीच्या दुधाचा पर्याय शोधत असलेल्या लोकांसाठी ते उत्कृष्ट आहे. त्यात शरीराला आवश्यक अशी चांगली फॅट्स (मेदयुक्त पदार्थ) असतात आणि कर्बोदकांचे प्रमाण कमी असते. लॅक्टोज- असहिष्णू लोकांसाठी हा एक उत्कृष्ट ‘डेअरी-फ्री ‘ पर्याय आहे जो त्याच्या मलईदार पोतामुळे ब्रेकफास्ट सीरिअल्स, स्मूदी आणि कॉफीमध्ये वापरला जाऊ शकतो.

अनुवाद: अन्योक्ती वाडेकर Translated by Anyokti Wadekar

Logged in user's profile picture