महिला दिग्दर्शक ज्यांनी गाठले सिनेसृष्टीच्या यशाचे शिखर!
8 minuteRead
                                    
                                
असं म्हणतात, कलाकाराला जात नसते, कलाकाराला धर्म नसतो मग कलाकारांमध्ये लिंग भेद सुद्धा का असावा? माझ्या मते कलाकार हा कलाकार असतो, मग तो कुठल्याही जाती, धर्म, पंथ, संप्रदायचा असो. अगदी चित्र रेखाटण्या पासून तर अभिनय करण्याऱ्या पर्यंत सगळ्यांना आपण कलाकार म्हणून संबोधित करू शकतो. पण आज आपण नजर टाकणार आहोत अश्या एका कलेवर ज्यामुळे अगदी स्वप्नमय वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा आपण आपल्या डोळ्यादेखत पाहू शकतो आणि ते म्हणजे दिग्दर्शन - सिनेमाचं दिग्दर्शन.
कलाकारांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नसावा पण वास्तविक परिस्थिती याहून फार वेगळी आहे. आज देखील बऱ्याच ठिकाणी स्त्रियांना पुरुषांच्या वर्चस्वाखाली काम करावं लागतं. पण अश्या विपरीत परिस्थिती सुद्धा ज्या दिग्दर्शिका सिनेसृष्टीत पाय रोवून बसल्या आणि यशाचं शिखर सुद्धा गाठलं, अश्याच काही स्त्रियांची यशोगाथा आज आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहे.
गौरी शिंदे
Source: media-amazon
गौरी यांचा जन्म ७ जुलै १९७४ रोजी पुणे, महाराष्ट्र येथे झाला. सिम्बॉयसिस पुणे येथून मास कम्युनिकेशन मध्ये पदवी (graduated) संपादन केली. इंग्लिश विंग्लिश मधून या चित्रपटा द्वारे दिग्दर्शिका म्हणून तिच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने सिनेसृष्टीत पदार्पण केले, हा चित्रपट गौरी यांच्या आईशी असलेल्या नातेसंबंधातून प्रेरित झालेला चित्रपट होता. गौरी यांच्या आई पुण्यातील त्यांच्या घराबाहेर स्वतःचा लोणच्याचा व्यवसाय चालवायच्या. त्या मराठी भाषिक महिला होत्या, ज्यामुळे गौरी यांच्या आईला इंग्रजी नीट बोलता येत नव्हतं. ज्याची गौरी यांना लहानपणी लाज वाटायची. गौरी यांनी एका मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे, "माझ्या आईला सॉरी म्हणण्यासाठी मी हा चित्रपट बनवला आहे."
हा चित्रपट 14 सप्टेंबर 2012 रोजी टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला आणि त्यानंतर 5 ऑक्टोबर 2012 रोजी भारतात आणि जगभरात त्याचे व्यावसायिक प्रकाशन झाले आणि समीक्षकांडून आणि व्यावसायिक रित्या देखील अशा दोन्ही प्रकारचे यश मिळवले. सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाच्या फिल्मफेअर पुरस्कारासोबतच त्यांना 'लैडली नॅशनल मीडिया अवॉर्ड्स फॉर जेंडर सेन्सिटिव्हिटी' या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले.
शोनाली बोस
Source:media-amazon
शोनाली बोस यांचा जन्म ३ जून १९६५ रोजी कलकत्ता, पश्चिम बंगाल येथे झाला, परंतु त्यांनी आपल्या तरुणाईतील जास्तितर आयुष्य मुंबई आणि नवी दिल्ली येथे व्यतीत केले. बोस यांनी दिल्ली विद्यापीठातून कला या विषयात पदवी मिळवली आणि कोलंबिया विद्यापीठ, न्यूयॉर्क येथून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. बोस यांनी सुमारे एक वर्ष नॅशनल लॉयर्स गिल्डचे संघटक म्हणून काम केले. बोस यांची 2014 ची निर्मिती, 'मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ' या चित्रपटामध्ये कल्की कोचलिन ही सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलीच्या भूमिकेत होती. 2014 टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात समीक्षकांनी या चित्रपटाची भरभरून प्रशंसा केली. या कार्यक्रमात चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आशियाई चित्रपटाचा NETPAC पुरस्कार मिळाला.
२०१२ च्या सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाने सनडान्स महिंद्रा ग्लोबल फिल्ममेकर अवॉर्ड सुद्धा पटकावला. न्यू यॉर्कमध्ये शिकतानाचे त्यांच्या वास्तविक जीवनातील अनुभव, सेरेब्रल पाल्सी असलेल्या मालिनी (बोस यांची चुलत बहीण) सोबतचे त्यांचे नाते आणि त्याच संबंधित त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही घटनांवरून बोस यांना हा चित्रपट बनवण्याची प्रेरणा मिळाली. हा चित्रपट मूळत: भारतातील सेन्सॉर बोर्डाने नाकारला होता, परंतु सेन्सॉर बोर्डच्या या निकालाच्या विरोधात बोस अपील जिंकल्या आणि भारतातील समलैंगिकतेवरील बंदी उठवल्यानंतर लवकरच तो प्रदर्शित झाला.
झोया अख्तर
Source: media-amazon
झोया अख्तर यांनी प्राइस ऑफ बुलेट्स नावाच्या म्युझिक व्हिडिओची सह-दिग्दर्शिका म्हणून आपल्या कारकीर्दीस सुरुवात केली. झोयाने स्प्लिट वाइड ओपन आणि दिल चाहता है या चित्रपटांसाठी कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केलं. त्याच बरोबर दिल चाहता है आणि लक्ष्य या चित्रपटांसाठी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील काम केले आहे. झोयाचा भाऊ फरहान अख्तर आणि कोंकणा सेन शर्मा अभिनीत लक बाय चान्स या चित्रपटा मधून दिग्दर्शनात पदार्पण केले. इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवणाऱ्या एका संघर्षशील अभिनेत्याची कथा यात मांडली आहे. बॉक्स ऑफिसवर कमी कामगिरी करूनही या चित्रपटाला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. २०११ मध्ये रिलीज झालेला, जिंदगी ना मिलेगी दोबारा याचं दिग्दर्शन सुद्धा झोयानीच केलं होतं. या चित्रपटामध्ये हृतिक रोशन, फरहान अख्तर, अभय देओल, कतरिना कैफ आणि कल्की कोचलिन यासारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने घवघवीत यश संपादन केले आणि या चित्रपटासाठी झोया यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला होता.
२०१३ मध्ये, झोयाने बॉम्बे टॉकीजसाठी अनुराग कश्यप, दिबाकर बॅनर्जी आणि करण जोहरसोबत काम केले. भारतीय चित्रपटसृष्टीच्या 100 वर्षपूर्ती उत्सव म्हणून तो बनवण्यात आला होता. २०१५ मध्ये, झोयाने रीमा कागतीसोबत टायगर बेबी फिल्म्स या भारतीय चित्रपट निर्मिती कंपनीची स्थापना केली. २०१८ मध्ये, तिने पुन्हा अनुराग कश्यप, दिबाकर बॅनर्जी आणि करण जोहर यांच्यासोबत लस्ट स्टोरीजसाठी एकत्र काम केले, जे जून 2018 मध्ये Netflix वर प्रीमियर झाले होते. दिल धडकने दो नंतर, झोयाने रणवीर सिंग आणि आलिया भट्ट अभिनीत गली बॉय हा चित्रपट दिग्दर्शित केला, जो मुंबईच्या रॅपर नेझीच्या जीवनावर आधारित होता. गली बॉयला फिल्मफेअरमध्ये दुसरा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. अशा प्रकारे दोनदा पुरस्कार जिंकणाऱ्या झोया एकमेव महिला दिग्दर्शक ठरल्या.
याच बरोबरीने अपर्णा सेन, मीरा नायर, सुधा कोंगरा, अश्विनी अय्यर तिवारी आणखी नावं घेऊ तितके कमी पडतील इतक्या महिला दिग्दर्शकांची मांदियाळी आपल्या भारताला लाभली आहे. या व्यतिरिक्त सुद्धा तुमची आवडती महिला दिग्दर्शक कोण आहेत हे आम्हाला खालील दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा!
Write, Record and Answer! Consume Unlimited Content! All you need to do is sign in and its absolutely free!
Continue with one click!!By signing up, you agree to our Terms and Conditions and Privacy Policy.
                

